मुंबई – कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू गेल्या एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कुस्तीपटू यांनी केला आहे, याला विरोध करत खासदाराने कुस्तीपटूंना नार्को टेस्टचे आव्हान दिले, या संपूर्ण वादावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकाराने जंतरमंतरवरील परिस्थितीबाबत निर्माण झालेले वातावरण कसे संपवणार? असा प्रश्न विचारल्यावर याला उत्तर देताना टिकैत म्हणाले, देशातील सरकारांनी चर्चा करावी, चर्चेनंतर प्रकरण सोडवण्यासाठी समित्या स्थापन केल्या पाहिजेत आणि त्या समित्यांमधून जे काही समोर येईल त्यावर कारवाई झाली पाहिजे.
टिकैत पुढे म्हणाले, ‘देशात असा कायदा आहे की, जर एखाद्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप असेल तर कायद्यानुसार त्याला अटक केली जाते, मात्र या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली नाही. हा देशातील महिलांचा अपमान असल्याचा आरोप टिकैत यांनी केला.’