पुणे – देशाच्या सीमा बंद करण्यापेक्षा “ओमायक्रॉन’ हा व्हायरस रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर हाच मोठा उपाय असल्याचे मत, दक्षिण आफ्रिकेतील साथरोगतज्ज्ञ प्रो. सलीम अब्दुल करीम यांनी “लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले आहे.
बाधित देशांतून प्रवाशी वाहतूक बंद करणे हा पर्याय नाही. या उलट ते धोकायदायक ठरू शकते. यामध्ये एखाद्या देशाला कुंपण घालून नव्हे तर याविरुद्ध जगाने एकत्रित येऊन लढणे आवश्यक आहे. प्रवासावर बंधने घातली तर संक्रमण उशीरा होईल. परंतु, ते बंद होणार नाही. हे आपल्याला डेल्टाने शिकवले आहे. आपण त्याला थोपवण्याचा प्रयत्न केला तर तो नवनवीन प्रकारात समोर येत आहे, असे प्रो. करीम यांनी सांगितले.
करोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करणे, सुरक्षित प्रवास, लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. प्रवासा आधी आरटीपीसीआर टेस्ट करणे, बाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळणे आदी उपाययोजना गरजेच्या आहेत. याशिवाय लसीकरणाचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे ते करून घेणे गरजेचे आहे, असेही प्रो. करीम यांचे मत आहे.
…तेंव्हा नवा व्हेरियंट दिसला
“ओमायक्रॉन’ हा व्हायरस सुरूवातीला बोत्सावनमध्ये आढळला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आढळला. आधी याप्रकारचे रुग्ण वाढत होते. पहिल्यांदा येथील विद्यार्थ्यांमध्ये रुग्ण आढळले. ज्यावेळी खासगी प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सिंग केले तेव्हा हा नवा व्हेरियंट दिसला. त्यानंतर त्याची माहिती “डब्ल्यूएचओ’ ला दिल्याचे प्रो. करीम यांनी सांगितले.
लसींबाबतही काही सांगता येणार नाही…
आजपर्यंत आढळलेल्या व्हायरस मध्ये अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा हे आहेत. परंतु, हा त्या वर्गापेक्षा भिन्न आणि वेगाने संक्रमित होणारा आहे. याचा अद्याप पूर्णपणे अभ्यास झाला नसल्याचे, प्रो. करीम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लसींच्या उपयोगाबाबतही अद्याप काही सांगता येणार नाही; केवळ म्युटेशनच्या आधारावर काही प्रमाणात त्याचे वैशिष्टे दिसून येतात, असे निरीक्षण प्रो. करीम यांनी नमूद केले आहे.
“लस’ गंभीर होण्यापासून वाचवणार…
दुसऱ्या लाटेमध्ये व्हायरसचे झालेले म्युटेशन पाहता “डेल्टा प्लस’ हा अधिक संक्रमित होणारा होता. मात्र हा त्यापेक्षा अधिक वेगवान असल्याचे काही पुराव्यांनी समोर आले आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना याची बाधा लगेचच होण्याची शक्यता आहे. लस ही रुग्ण गंभीर होण्यापासून वाचवणारी आहे. लसीमुळे निर्माण झालेला टीसेलची साखळी तोडणे अवघड आहे, ही जमेची बाजू आहे, असे त्यांचे मत आहे.