बंगळुरू – संपूर्ण जगाला पुन्हा एकदा चिंतेच्या खाईत लोटणाऱ्या ‘ओमायक्रॉन’ने भारतात प्रवेश केला आहे. करोना विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटक येथे आढळून आले आहेत. ६६ वर्षीय व ४६ वर्षीय वय असलेले हे दोन्ही बाधित ‘ऍट रिस्क’ देशांच्या यादीत असलेल्या देशातून भारतात दाखल झाले होते.
अशातच आता यातील २० नोव्हेंबरला बंगळुरू विमानतळावर दाखल झालेला ६६ वर्षीय पुरुष रुग्ण २७ नोव्हेंबरला पसार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यागूनही चिंतेची बाब म्हणजे हवाई वाहतूक करून कर्नाटकात दाखल झालेल्या १० प्रवाशांशी संपर्क होत नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.
ओमायक्रॉन बाधा झालेला रुग्ण विमानतळावर दाखल झाला त्याच वेळेस आलेल्या एकूण ५७ प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. मात्र यातील १० प्रवाशांशी सध्या संपर्क होत नाहीये. या प्रवाशांनी आपले मोबाईल देखील स्विच ऑफ केले असल्याची माहिती मिळाली आहे.
एका उच्चस्तरीय बैठकीनंतर कर्नाटकचे महसूलमंत्री आर अशोक यांनी याबाबत माहिती देताना, “आज रात्रीपर्यंत संपर्क होत नसलेल्या १० प्रवाशांसोबत संपर्क प्रस्थापित केला जाईल. कोणताही प्रवासी आरटीपीसीआर चाचणीचा निकाल येईपर्यंत विमानतळ सोडू शकत नाही.” अशी माहिती दिली.
बंगळुरू महापालिकेने नेमकी काय माहिती दिली?
प्रवाशाचे वय – ६६ वर्ष
कोठून आला – दक्षिण आफ्रिकेतून (दुबई मार्गे)
१) दक्षिण आफ्रिकेहून २० नोव्हेंबरला आलेल्या प्रवाशाची बंगळुरू विमानतळावर तपासणी व करोना चाचणी करण्यात आली. प्रवाशाकडे दक्षिण आफ्रिकेतील कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट होता. तसेच त्याचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते.
२) बंगळुरू विमानतळावरून त्याने एका हॉटेलमध्ये चेकइन केले. दरम्यानच्या काळात प्रवाशाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
३) युपीएचसीच्या डॉक्टरांनी हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली. रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्याने त्याला सेल्फ आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला.
४) २२ नोव्हेंबरला रुग्णाचे टेस्ट सॅम्पल घेऊन जीनोम सिक्वेन्सिंगसाठी बीबीएमपीला पाठवण्यात आले.
५) त्या प्रवाशाने एका खासगी प्रयोगशाळेत करोना चाचणी करून घेतली. २३ नोव्हेंबरला केलेल्या या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.
६) या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. सर्वजण निगेटिव्ह असल्याचे समोर आले.
७) २२ व २३ नोव्हेंबरला युपीएचसीने रुग्णाच्या दुय्यम संपर्कातील २४० जणांची चाचणी केली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.
८) २७ नोव्हेंबरला या व्यक्तीने हॉटेलमधून चेकआउट केले. येथून त्याने कॅब करत विमानतळावर गेला. तेथून तो दुबईला रवाना झाला.