नवी दिल्ली – ओमायक्रॉन आणि कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असलेल्या किंवा लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या 10 राज्यांमध्ये केंद्र सरकार केंद्रीय आरोग्य पथके पाठवणार आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये पथ पाठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या यादीतील पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.
या राज्यांच्या दौऱ्यावर केंद्रीय पथक तीन ते पाच दिवस तैनात असेल. या काळात ते राज्य आरोग्य अधिकाऱ्यांसोबत कोविड चाचणी, पाळत ठेवणे, उपाययोजना करणे याबाबत चर्चा करतील. केंद्रीय पथक प्रत्येक राज्यात कोविड लसीकरणाची प्रगती तपासणार आहे. यासोबतच रुग्णालयातील खाटा आणि वैद्यकीय ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा आढावा घेणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे की, “राज्यस्तरीय केंद्रीय पथके परिस्थितीचे मूल्यांकन करतील, उपाययोजना सुचवतील आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांबाबत दररोज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अहवाल सादर करतील.”
याव्यतिरिक्त, केंद्रीय टीमच्या पुनरावलोकन चेकलिस्टमध्ये ओमायक्रॉन स्ट्रेनची प्रकरणे ओळखण्यासाठी नमुन्यांची जीनोम अनुक्रमणिका देखील समाविष्ट असेल. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली आहे की, ओमायक्रॉन प्रकार हा देशात करोनाची दुसरी लाट पसरवणाऱ्या डेल्टा प्रकारापेक्षा जास्त प्रमाणात संसर्गजन्य असून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.