दुबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरींच्या सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ओमान संघाच्या युसूफ अब्दुलरहिम अल बलुशी याच्यावर आयसीसीकडून बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
अल बलुशी याने आपल्यावरील चार आरोप मान्य केले. दुबईत गतवर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धांसाठीचे पात्रता सामने खेळवण्यात आले होते. त्या सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग करण्याबाबत चार आरोप त्याने मान्य केले. त्यानंतर त्याच्यावर ७ वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली.
२९ वर्षाच्या अल बुरशी याने टी-२० विश्वचषक स्पर्धांसाठी खेळवण्यात आलेल्या पात्रता सामन्यात त्याने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला आणि आपल्या संघातील सहका-यांनादेखील मॅच फिक्सिंगसाठी मदत करण्यास सांगितले. या वर्तणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर ७ वर्षाची बंदी घातली.
मॅच फिक्सिंग हा खूपच गंभीर गुन्हा आहे, पण बलुशीने गुन्हा कबूल केला आणि तपासात पूर्णपणे सहकार्य केले म्हणून त्याच्यावर केवळ ७ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणात काही वेळा मोठी शिक्षादेखील होऊ शकली असती. मॅच फिक्सिंग करणा-यांना नियमावलीनुसार आजीवन क्रिकेट बंदीचीही तरतूद आहे, असे आयसीसीचे वरिष्ठ अधिकारी अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले.