दिल्ली दंगलींबाबत गौतम गंभीर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – दिल्लीत भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी रविवारी एका निदर्शनाच्या स्थळी अत्यंत गंभीर भाषेत प्रक्षोभक भाषण केले. त्यानंतरच त्या भागात दंगली झाल्या आहेत. कपिल मिश्रा यांच्या या प्रक्षोभक भाषणाचे कोणीही समर्थन करणार नाही त्यांची ही भाषा आम्हाला अमान्य आहे असे भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी म्हटले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वातावरण बिघडेल असे वक्तव्य करणे टाळायलाच हवे असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की शाहीनबागेत इतके दिवस शांततेने आंदोलन सुरू होते. पण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे दिल्लीत येण्यावेळीच येथे अशाप्रकारचा हिंसाचार सुरू होणे दुर्देवी आहे.
निदर्शकांपैकी एकजण पोलिसाच्या पुढे पिस्तुल घेऊन उभा कसा राहु शकतो असा सवालही गौतम गंभीर यांनी उपस्थित केला. कपिल मिश्रा यांनी आपल्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ स्वताच सोशल मिडीयावर प्रसारीत केला असून त्यात त्यांनी तीन दिवसांत सीएएच्या विरोधातील आंदोलन मागे घेतले नाही तर आम्हालाही शांत बसता येणार नाही असा इशारा दिला होता. मिश्रा यांच्या निदर्शनांनंतरच उत्तरपुर्व दिल्लीत हिंसाचार सुरू झाला आहे. दिल्ली दंगलींबद्दल गौतम गंभीर यांनी कपिल मिश्रा यांच्यावर कारवाईची जी मागणी केली आहे त्याला कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांनीही पाठिंबा दिला आहे.