वाडा पुनर्वसनमध्ये सहभाग वाढविण्याचा फंड : लकी ड्रॉ मधून निवडणार विजेता
कोरेगाव भीमा : वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील विकासकामे, सकारात्मक, रचनात्मक बदलासाठी व ग्रामसभेला ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी सरपंच योगिता नितीन ढोरे यांनी लकी ड्रॉचे आयोजन करत अभिनव उपक्रम राबविला आहे.
येथील सरपंच ढोरे यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्यामुळे ग्रामविकासासाठी ग्रामस्थांचा व्यापक सहभाग असायला हवा व विकासकामांवर सर्वांगीण चर्चा व्हावी,
नवनवीन विकासकामे व जनहिताच्या अभिनव कल्पना सर्वांनी मांडत गावाचा विकास कसा असावा, यासाठी प्रत्येकाचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. त्यासाठी त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला असून, यामध्ये एका ग्रामस्थाची लकी ड्रॉच्या माध्यमातून चालू वर्षाची घरपट्टी भरण्यात येणार आहे.
या कल्पनेचा समाजमाध्यमावर सरपंच ढोरे यांची विकासाप्रती असणाऱ्या जाणिवेची व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उपक्रमाप्रती त्यांचे कौतुक होताना सरपंच असावा तर असा अशी शाबासकी मिळत आहे. ही ग्रामसभा गुरुवारी (दि.18) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच ढोरे यांच्या लकी ड्रॉ निवडीच्या माध्यमातून एका ग्रामस्थाच्या घराची चालू वर्षाची घरपट्टी भरण्यात येणार असल्याने ग्रामस्थांमध्येही याबाबत उत्सुकता आहे.
वाडा पुनर्वसन हे चासकमान धरणाखाली जमिनी गेलेल्या पुनर्वसितांचे उपेक्षित व दुर्लक्षित गाव असून, येथील ग्रामपंचायतीला अल्प उत्पन्न आहे. येथे उद्योग किंवा व्यवसाय नाहीत, त्यामुळे घर व पाणी पट्टीच्या अल्पशा उत्पन्नावर गावाचा कारभार चालतो. येथील वयोवृद्ध ग्रामस्थांच्या मनावर आजही धरणाखाली गेलेल्या गावच्या आठवणी आहेत.
दरवर्षी पावसाने धरण भरते तसे त्यांच्या काळजाला चटके देणाऱ्या व आयुष्याची दैना करणाऱ्या घटना उलगडत जातात. नांदती कुटुंबे उद्ध्वस्त होताना काळजाचा थरकाप उडतो आणि भरलेल्या डोळ्यांनी मरणयातना भोगत निर्जीव व निरुत्साही जगण्याच्या संघर्षाला तोंड देत उभे राहत नवीन प्रदेशात नियतीशी, सरकारशी, मुर्दाड प्रशासन व्यवस्थेशी दोन हात करत पुन्हा एकदा आयुष्याच्या मशाली पेटवत मांडावा लागतो कुटुंबासह जगण्याचा संघर्ष, अशी येथील परिस्थिती आहे.
गावातील नवनवीन सेवा-सुविधा याविषयी सूचना, प्रत्येकाचे मत जाणून घेण्यासाठी व गावात विकासात्मक तसेच रचनात्मक बदल घडवण्यासाठी, ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती वाढून ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
– सरपंच योगिता नितीन ढोरे, वाडा पुनर्वसन