पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सोमवारपासून अंतिम वर्ष परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाइन परीक्षेत तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे दोन तासांचा विलंब झाला. सकाळी दहा वाजता सुरू होणारा ऑफलाइन पेपर दुपारी साडेबारा वाजता सुरू झाला. त्यामुळे विद्यापीठाच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष लेखी परीक्षा असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यात जवळपास 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइनचा पर्याय निवडला. त्यानुसार सोमवारी सकाळी दहा वाजता पहिला पेपर होता. ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी “ओटीपी’ पाठवला नाही. त्यामुळे महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येत नव्हती. त्यामुळे सकाळी दहा वाजता सुरू होणारा पेपर साडेबारा वाजता सुरू झाला. काही ठिकाणी तीन तासांनी परीक्षा सुरू करावी लागली.
बहुतांश केंद्रांवर ऑफलाइन परीक्षेस विलंब झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांची बहुपर्यायी स्वरूपात अर्थात “एमसीक्यू’ पद्धतीने परीक्षा देण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची धाकधूक होती. त्यात तब्बल दोन तासांनी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, ऑफलाइनच्या सकाळच्या सत्रात उशिराने परीक्षा सुरू झाल्याने दुपारच्या सत्रातील परीक्षा वेळेत घेण्यासाठी महाविद्यालयांची धावपळ उडाली.
व्यत्यय आल्यास घाबरून जाऊ नये
दिवसभरात एकूण 1 हजार 811 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली. ऑफलाइन परीक्षा केंद्रावर काही ठिकाणी तांत्रिक समस्या आल्या. त्यावर उपाय करत असून, मंगळवारपासून ही अडचण येणार नाही. व्यत्यय आल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.