बंगळुरू – कर्नाटकमधून बेपत्ता झालेले तरुण शास्त्रज्ञ अभिषेक रेड्डी गुल्ला (वय 26) आंध्रप्रदेशात सापडले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
कर्नाटकच्या म्हैसूरमधील भाभा अणुसंशोधन केंद्रात अभिषेक कार्यरत आहेत. ते 6 ऑक्टोबरपासून म्हैसूरमधून अचानकपणे बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांबरोबरच कुटुंबीय आणि मित्रांनी मोहीम हाती घेतली. अखेर ते आंध्रच्या विजयवाडात सापडले. मात्र, त्याविषयीचा अधिक तपशील पोलिसांकडून देण्यात आला नाही.
मूळचे आंध्रचे रहिवासी असणारे अभिषेक अविवाहित आहेत. त्यांनी म्हैसूरमध्ये राहण्यासाठी भाड्याने एक खोली घेतली. तिथून ते 6 ऑक्टोबरला दुचाकीवरून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी पैशाचे पाकीट आणि मोबाइल फोनही समवेत घेतला नव्हता. त्यांच्याशी कुटुंबीयांचा आणि कार्यालयाचा बराच काळ संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली.
ते 17 सप्टेंबरपासून ड्युटीवर गैरहजर होते. त्यामुळे बेपत्ता होण्याआधी आदल्यादिवशी त्यांच्याशी कार्यालयातील वरिष्ठांनी संपर्क साधला. पुढच्या दिवसापासून कामावर हजर होणार असल्याचे अभिषेक यांनी वरिष्ठांना सांगितले. मात्र, कामावर पुन्हा रूजू होण्याच्या दिवशीच ते बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. आता त्यांच्या बेपत्ता होण्यामागच्या कारणांचा शोध पोलीस घेणार आहेत.