पाटण – पाटण येथील निवडणूक प्रशिक्षणासाठी मतदार संघातील नेमून दिलेले 29 मतदान अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार असून आयोगाने त्यांच्याविरोधात कारवाईची नोटीस जारी केली असल्याची माहिती पाटणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.
येथील रणजितसिंह पाटणकर सभागृहात 45 सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि 261 पाटण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रवी माने, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षणात व्हीव्हीपॅट मशीनचे कार्य, त्यावर मतदारांना दिसणारी पावती, ईव्हीएम यंत्र आणि त्यामधील तांत्रिक बाबींची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यंत्रांची जोडणी व हाताळणी याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशाची माहिती आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
261 पाटण विधानसभा मतदार संघातील पाटण आणि कराड तालुक्यातील सुपने मंडलातील अशी एकूण 397 मतदान केंद्रे असून लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अशा संयुक्त निवडणुकीसाठी पाटण मतदार संघात निवडणुकीचे हे पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. हे प्रशिक्षण केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक 1 साठी होते. प्रशिक्षणानंतर उपस्थितांची उजळणी परीक्षाही घेण्यात आली आणि प्रशिक्षणाबाबत देण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने सर्व शंकांचे निरसण करण्यात आले.
या निवडणूक प्रशिक्षणासाठी एकूण 497 केंद्राध्यक्ष व 497 मतदान अधिकाऱ्यांपैकी 13 केंद्राध्यक्ष आणि 16 मतदान अधिकारी असे मिळून एकूण 26 अधिकारी गैरहजर राहिले होते. त्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांना निवडणूक आयोगाकडून लेखी नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही तांबे यांनी सांगितले.