नवी दिल्ली : जगात युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीपासून ते आजपर्यंत बलाढ्य असणाऱ्या रशियासोबत युक्रेन चिवट लढा देत आहे, युक्रेनच्या या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत असताना दुसरीकडे युक्रेनच्या एका ट्विटमुळे भारतात एकच गोंधळ उडाला आहे.
युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या एका ट्विटमुळे भारताच्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हिंदू देवता कालीमातेशी साम्य असलेला एक आक्षेपार्ह फोटो फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून संबंधित ट्वीट ‘हिंदूफोबिक’ असल्याचे म्हटले आहे. शिवाय याप्रकरणी युक्रेन सरकारने माफी मागावी, अशी मागणीही नेटकऱ्यांनी केली.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक स्फोटाचा फोटो शेअर केला असून त्याला “वर्क ऑफ आर्ट” असं कॅप्शन देण्यात आले आहे. यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोसारखा अपस्कर्ट पोजमध्ये एका महिलेचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो हिंदू देवता कालीमातेशी साम्य आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हे ट्वीट केल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. यानंतर संबंधित ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे.
याप्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विटरवर, अलीकडेच युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री भारताकडून पाठिंबा मागण्यासाठी दिल्लीत आले होते. पण युक्रेन सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांनी एका प्रोपगंडा पोस्टरवर भारतीय देवी काली मातेचे व्यंगचित्र काढले आहे. हा जगभरातील हिंदूंच्या भावनांवर केलेला आघात आहे, असे म्हटले आहे.