पुणे -राज्यातील पर्यटनस्थळी निवासासाठी आता वैयक्तिक “कॅरव्हॅन’ वापरता येणार आहे. यासाठी “एमटीडीसी’ अर्थात पर्यटन महामंडळाने पुढाकार घेतला आहे. अशा “कॅरव्हॅन’ना पर्यटनस्थळी नेऊन त्यामध्ये निवासाची परवानगी पर्यटन विभागाकडून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही “कॅरव्हॅन’ किंवा कॅम्पर व्हॅनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे.
राज्यात निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक किल्ले, टेकड्या, दुर्गम भाग, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी आणि धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पक्के बांधकाम करता येत नाही. परिणामी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव यासाठी कॅरव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या सहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अधिक माहिती www.maharashtratourism.gov. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नोंदणी आवश्यक
कॅरव्हॅनमध्ये बेडची सुविधा, किचन, टॉयलेट, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाच्या दृष्टीने त्याची बांधणी केली असेल. सिंगल एक्सेल कन्व्हेंशल कॅरव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅरव्हॅन, कॅम्पर ट्रेलर अशा प्रकारचे कॅरव्हॅनचे विविध प्रकार असतील. परिवहन आयुक्तांकडे या कॅरव्हॅनची नोंदणी करावी लागेल. कॅरॅव्हॅन पार्क व कॅराव्हॅन तसेच हायब्रीड कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी लागेल.
मोकळ्या जमिनीवर तसेच कृषी पर्यटन केंद्रांच्या ठिकाणीदेखील कॅरव्हॅन पार्क करता येतील. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात पर्यटनाचा, जैवविविधतेचा आनंद घेता येणार आहे. या संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खासगी गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळेल. दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
– दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी