पश्‍चिमेला मुसळधार बॅटिंग

कोयना धरणाचा पाणीसाठा 67.86 टीएमसी

साताऱ्यातील जनजीवन विस्कळीत
सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सातारकरांचे जीवनमान पूर्णत: विस्कळीत झाले होते. सकाळी आणि सायंकाळी शहरात काही प्रमाणात वर्दळ होती. मात्र, दुपारच्या वेळेस रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. पावसाचा जोर कायम राहिल्याचा परिणाम व्यावसायिकांवर देखील मोठ्या प्रमाणात झाला होता. शहरातील पोवई नाका, राजपथ, मोतीचौक व खण आळीच्या बाजारपेठांमध्ये खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती.

सातारा / पाटण – जिल्ह्याच्या पश्‍चिमेला मुसळधार पावसाची बॅटिंग कायम असून परिणामी धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राज्याचे लक्ष असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा 67.87 टीएमसीपर्यंत पोहचला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप 37 टीएमसीची आवश्‍यकता आहे.

दरम्यान, सातारा, वाई, जावली, महाबळेश्‍वर, कराड आणि पाटण तालुक्‍यात रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. परिणामी 24 तासांत कोयना धरणात साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कण्हेर धरणामध्ये 7.70 टीएमसी, उरमोडी 5.53 टीएमसी, धोम 6.81 टीएमसी, बलकवडी 3.22 टीएमसी तर तारळी धरणाचा पाणीसाठा 4.84 टीएमसीपर्यंत पाणीसाठा पोहचला आहे. यापैकी तारळी धरणामधून दोन हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्‍याच्या विविध भागांत सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्याचबरोबर सलग दोन दिवस जोरदार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे.  धरणामध्ये प्रतिसेकंद 35 हजार क्‍युसेक्‍स पाण्याची आवक होत असून पाणीपातळी 2127.06 फूट झाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यत कोयना धरणाचा पाणीसाठा 67.86 टीएमसीवर पोहचला.

सलग दोन दिवस कोयना, नवजा या ठिकाणी धुवॉंधार पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या शुक्रवारपासून कोयना पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर असाच राहिल्यास यावर्षी पंधरा ऑगस्टच्या डेडलाईनला कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल असे चित्र आहे. रम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या ओढे-नाले तसेच महाबळेश्‍वर या ठिकाणी पडणारा पाऊस यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना 223 मिलिमीटर, नवजा 257 मिलिमीटर तर महाबळेश्‍वरला 288 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)