ढोल-ताशा पथकांना दोन दिवसांत परवानगी – गिरीश बापट

पुणे -“शहरातील कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकांनी गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेला आहे. काही वर्षांपूर्वी उत्सव केवळ मंडळांपुरता मर्यादित होता. मात्र, आता ढोल-ताशा पथकांनी त्यामध्ये क्रांती आणली आहे. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला असून आयुक्तांशी चर्चा करुन पथकांना पुढील दोन दिवसांत परवानग्या देण्यात येतील,’ असे आश्‍वासन खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी दिले.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रच्या वतीने सिंहगड रस्ता येथे रविवारी वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बापट बोलत होते. कार्यक्रमास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, आमदार भीमराव तापकीर, स्वरदा बापट, ऍड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते.

“ढोल-ताशा पथकांनी वादन करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजीदेखील घ्यायला हवी. सर्व राजकीय पक्ष आणि प्रतिनिधी गणपतीसाठी कायमच सोबत आहोत. प्रत्येक पथकातील वादक संख्या, ज्या मंडळांसमोर वादन करायचे त्यांची संख्या याचा विचार करून ठरविणे गरजेचे आहे,’ असे बापट म्हणाले.

तर, “पोलिसांसोबत गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकांचे वादक यांचा होणारा वाद समन्वयातून सोडविण्यासाठी प्रयत्न करू. मंडळांसह ढोल-ताशा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विश्‍वासात घेऊन काम करू,’ असे मत देशमुख यांनी व्यक्‍त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)