शिक्षक भरतीत 70 जागा घटणार

आरक्षण बदलाचा परिणाम : उमेदवार निवडीबाबत 2 ऑगस्टला जाहीर होणार सूचना

पुणे – पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीसाठी आरक्षणातील बदलामुळे सुमारे 70 जागा कमी होणार आहेत. उमेदवारांच्या निवडीबाबत दि.2 ऑगस्ट रोजी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या 12 हजार रिक्त जागांसाठी पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी 1 लाख 24 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यातील 83, 700 उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदविले आहेत.

एसईबीसी प्रवर्गासाठी 16 ऐवजी 13 टक्‍के आरक्षण लागू करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आरक्षण बदलानुसार भरतीसाठी आरक्षणात सुधारणा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. एसईबीसीसाठी एकूण 1,400 जागा आहेत. यातील 3 टक्के जागा कमी कराव्या लागणार आहेत. यातही प्रामुख्याने मोठ्या संस्थांमधील काही जागा कमी होणार आहेत. या जागा पुढील टप्प्यात भरण्यात येणार आहेत.

दरम्यान, दि.5 ऑगस्टपर्यंत उमेदवार निवड यादी जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. त्यामुळे शासनाने भरती प्रक्रियेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. “एनआयसी’मध्ये भरती प्रक्रियेचे पोर्टलवर काम करण्यात अधिकारी मग्न आहेत. निवड यादी तयार करुन त्याची तपासणी करण्याची कार्यवाहीही सुरू आहे. आठवडाभरात शासनाचे आदेश आले, की यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र, याबाबतचे वेळापत्रक आधी उमेदवारांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)