मंचर- आंबेगाव तालुक्यात मंचर येथे दोन, कुरवंडी येथे दोन, तांबडेमळा येथे एक, पारगावतर्फे खेड येथे एक रुग्ण असे एकूण सहा रुग्ण शुक्रवार (दि. 31) रात्री आढळले आहेत. आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 277 झाली असून, 201 रुग्ण बरे झाले आहेत. पाच मयत असून 71 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी शनिवार (दि. 1) सकाळी दिली.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले असून, नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे. गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले की, निर्जंतुकीकरण करून गावात स्वच्छता केली जाणार आहे.