पुनवडीची वाटचाल करोनामुक्तीच्या दिशेने

162 पैकी 159 जणांनी केली करोनावर मात
केळघर (प्रतिनिधी) –
हॉट स्पॉट ठरलेले पुनवडी (ता. जावळी) गाव करोनामुक्तीच्या दिशेने चालले असून येथील ग्रामस्थांनी करोनाशी जिद्दीने लढत दिली आहे. गावातील 162 पैकी 159 रुग्ण उपचार घेऊन घरी आले आहेत.

पुनवडीतील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पुनवडी येथे साखळी खंडित होण्यासाठी प्रशासनाने मोलाचे प्रयत्न केले. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले. त्यामुळे येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले राहिले. आशा व अंगणवाडी सेविकांनी जीवावर उदार होऊन काम केल्याने येथील साखळी खंडित झाली आहे, असे मत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे यांनी व्यक्त केले.

पुनवडी येथे आशा व अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, आरोग्य सेविका आस्मा शेख, आरोग्य सेवक मोहनराव शिंदे, आशा कविता पार्टे, आरती भिलारे, रुपाली ओंबळे, शीतल सुर्वे, अंगणवाडी सेविका संजना पार्टे उपस्थित होते.

आशा व अंगणवाडी सेविका गावात जाऊन रोज सर्वेक्षण करत आहेत. संसर्ग वाढल्याने आरोग्य विभागाच्या वतीने आशांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या आशा व अंगणवाडी सेविका रोज गावातून फिरून करोनासदृश्‍य रुग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला देतात. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविका याच खऱ्या करोना योद्‌ध्या असल्यामुळे त्यांना वाढीव मानधन मिळावे, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.