नेपाळशी यापुढेही घनिष्ट संबंध ठेवणार – शी जिनपिंग यांचे प्रतिपादन

बीजिंग – नेपाळबरोबर चीनला घनिष्ट संबंध कायमच ठेवायचे आहेत, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. नेपाळमध्ये पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे चीनचे मित्र आहेत; परंतु त्यांना सत्तेवरून घालवून देण्याचा प्रयत्न तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या गटाने हाती घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर शी यांच्या वक्‍तव्याला महत्त्व दिले जात आहे.

चीन-नेपाळ संबंधांना 65 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त चीनच्या अध्यक्षांनी नेपाळच्या अध्यक्षांना अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी नेपाळबरोबर अधिक निकटतेने काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या दिवसापासून चीन आणि नेपाळ यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले त्या दिवसांपासून आम्ही नेपाळबरोबर अधिक सहयोगाने काम करण्यात कायमच उत्सुकता दाखवली आहे. 

आपसांतील सामंजस्य आणि सहकार्य वाढवून परस्पर देशातील नागरिकांना याचा लाभ होईल असाच प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. चीनचे पंतप्रधान आणि नेपाळच्या पंतप्रधानांनीही यानिमित्त एकमेकांना संदेश पाठवून अशीच इच्छा व्यक्त केली आहे. चीनने बेल्ट ऍन्ड रोडचा एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे तसेच ट्रान्स हिमालय मल्टी डायमेंशनल कनेक्‍टीव्हीटी प्रकल्पाचीही सुरुवात झाली आहे. या दोन्ही प्रकल्पात नेपाळने चीनला सहाय्यभूत भूमिका घेतली आहे. 

भारत आणि नेपाळ यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न नेपाळकडून होत असून भारतविरोधी भूमिका घेणारे नेपाळी पंतप्रधान ओली यांची सत्ता कायम राहावी यासाठी चीनने तेथे उघड प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी अधिक जवळिकीने काम करण्याचा जो निर्धार आज व्यक्‍त केला आहे त्याला सध्याच्या राजकारणात अधिक महत्त्व आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.