आता शाहीदही क्रिकेटपटूच्या भूमिकेत

बॉलीवूडला सध्या क्रिकेटविश्‍वाचे वेड लागले आहे. त्यामुळेच एकामागोमाग एक क्रिकेट स्पर्धांवर किंवा क्रिकेटविश्‍वातील खेळाडूंवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. सचिन तेंडुलकर, धोनी यांच्यावरील बायोपिकनंतर “83′ हा चित्रपट विश्‍वचषक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार राहिलेल्या कपिल देवची व्यक्‍तिरेखा अभिनेता रणवीर सिंह साकारत आहे.

त्याच्या लूकविषयीची चर्चा भरात असतानाच आता शाहीद कपूरही एका क्रिकेटरच्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. “जर्सी’ नामक या चित्रपटाविषयी शाहीदला विचारले असता तो म्हणतो की, 83 आणि जर्सी हे दोन्ही वेगवेगळे विषय असणारे चित्रपट आहेत.

जर्सी हा एका तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहीद म्हणतो की, 83 हा चित्रपट भारताच्या पहिल्या विश्‍वचषक विजयासंदर्भात आहे, तर जर्सी हा चित्रपट एका व्यक्‍तीचा जीवनप्रवास आहे. हा एक अत्यंत भावनाशील चित्रपट असेल आणि मला खात्री आहे की तो सर्वांनाच आवडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.