सचिन वारागडे
राष्ट्रवादी-भाजपमध्ये सामना रंगण्याची चिन्हे; दीपक पवार, सौरभ शिंदे, ऋषिकांत शिंदे इच्छुक
कुडाळ – राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केल्यानंतर जावळी तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दीपक पवार यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त जागेचीही पोटनिवडणूक लागली आहे. या गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. इच्छुकांमध्ये माजी सदस्य दीपक पवार, सौरभ शिंदे, सुहास गिरी, ऋषिकांत शिंदे आदी प्रमुख नावे आहेत. पोटनिवडणुकीत 12 डिसेंबरला मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदारसंघात मोठी स्थित्यंतरे झाली होती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा त्याग करून भाजपची वाट धरली. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शिवेंद्रराजेंच्या विरोधात लढलेल्या दीपक पवार यांची गोची झाली होती. त्यामुळे त्यांनीही पक्षबदलाचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दीपक पवार यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने कुडाळ गटाची जागा रिक्त झाली होती. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर कुडाळ गटात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. कुडाळ गटातून निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक आहेत.
दीपक पवारांनी विधानसभा निवडणुकीत पक्ष बदलून दुसऱ्यांदा नशीब आजमावले; परंतु पक्षांतर करूनही त्यांना शिवेंद्रराजेंपुढे पुन्हा अपयश आले. आता कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीत ते राष्ट्रवादीकडून पुन्हा इच्छुक आहेत. गेल्या आठ वर्षांपासून या गटावर दीपक पवार यांचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीकडून जावळी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सौरभ शिंदे, उद्योजक सचिन शिंदे, माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, माथाडी कामगार नेते सुरेश गायकवाड, मच्छिंद्र
मुळीक आदी इच्छुकांची नावेही
चर्चेत आहेत. त्याशिवाय अनेक जण दोन्ही पक्षांकडून इच्छुक आहेत. या गटात पुन्हा एकदा राष्ट्रवादी
विरुद्ध भाजप असा संघर्ष पहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, लढतीचे संदर्भ काहीसे बदलले आहेत. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीत आहेत. या पक्षांतरामुळे या गटात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे. पोटनिवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या जावळीतील गावागावातील पारांवर या पोटनिवडणुकीची चर्चा रंगत आहे.