पिंपरी – शासनाची पेन्शन मिळवून देतो, असे सांगत दोनशे महिलांची फसवणूक करणाऱ्या दांपत्याने फ्लॅट विक्रीच्या नावाखाली एका महिलेला 38 लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना वल्लभनगर, पिंपरी येथे घडली. अनेकांना गंडा घालणारी ही बंटी बबलीची जोडी सर्वांच्या हातावर तुरी देऊन गायब झाली आहे.
अरविंद यादवराव पराते (वय 35) आणि प्रतिभा अरविंद पराते (वय 23, दोघेही रा. विनित प्लाझा, वल्लभनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. रुपाली प्रकाश बिरादार (वय 44, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जुलै 2019 ते 3 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून आपला विनित प्लाझा येथील फ्लॅट विकायचा असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. मात्र त्या फ्लॅटवर 29 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपी आणि फिर्यादी यांच्या 35 लाख 70 हजार रुपयांना फ्लॅटचा व्यवहार ठरला. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी रुपाली यांच्याकडून 38 लाख रुपये घेतले. ऍग्रीमेंट करताना उर्वरित पैसे परत देतो, असे त्यांनी फिर्यादी यांना सांगितले. मात्र फ्लॅट नावावर न करता फिर्यादी यांची फसवणूक केली.
याच दांपत्याने सरकारी पेन्शन मिळवून देतो, असे सांगत जवळपास दोनशे महिलांकडून त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्र घेतली. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही रक्कम महिलांना दिली. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे महिलांच्या नावावर कर्ज काढून महिलांना त्याचे हप्ते भरण्यास भाग पाडले. याबाबत 16 ऑक्टोबर रोजी शिवकन्या दळवे या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली आहे. मात्र फसवणूक करणाऱ्या या बंटी बबलीच्या जोडप्याने शहरातून धूम ठोकली आहे.