बॉलीवूड आणि हॉलीवूड कलाकारांना सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक गमतीशीर, धक्कादायक आणि भीतीदायक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यांचा चाहता वर्ग इतका दिवाना असतो की त्यांच्यामुळे या कलाकारांना खासगीपणा जपणे कठीण होऊन जाते.
हल्ली सेल्फीमुळे तर कलाकार कुठेही दिसले की कोणी तरी येऊन सेल्फी काढण्याची विनंती करतो. असे एक ना अनेक किस्से कलाकारांबाबत घडत असतात. पण हॉलीवूड अभिनेता डॅनियल रेडक्लिफबाबत एक या सगळ्याहून भन्नाट किस्सा घडला आहे.
डॅनियल आपल्या गर्लफ्रेंडसोबत न्यूयॉर्कमधील एका दुकानाबाहेर थांबला होता. त्याची गर्लफ्रेंड दुकानामध्ये काही वस्तू आणण्यासाठी गेली होती. डॅनियलने बझ कोट परिधान केला होता आणि तो कुत्र्याशी खेळण्यासाठी गुडघ्यावर बसला होता. तेवढ्यात एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याला पाच डॉलर देऊ लागला.
“तुझ्यासाठी कॉफी घेऊन ये मित्रा, बाहेर खूप थंडी आहे’ असे तो माणूस डॅनियलला पैसे देत म्हणाला. हा किस्सा सांगताना डॅनियल खूप हसत होता. डॅनियल हा हॅरी पॉटरच्या भूमिकेसाठी जगभरात ओळखला जातो. वेगवेगळ्या टीव्ही कार्यक्रमांमधूनही तो झळकत असतो. असे असताना एखाद्या व्यक्तीने त्याला न ओळखणे ही धमालच म्हणायची !