…आता पुणे महापालिकेचे ‘जम्बो’ नियोजन

  • कोविड हॉस्पिटलमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश देणार
  • रुग्ण किंवा नातेवाईकांनी हेल्पलाइनवर साधावा संपर्क

पुणे – जम्बो कोविड रुग्णालयात प्रमाणित केंद्रीय पद्धतीने रुग्णांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या कोविड बेड हेल्पलाइन किंवा इतर कोविड रुग्णालयांच्या संदर्भानेच प्रामुख्याने प्रवेश देण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त आणि जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.

 

वर्गीकरण केल्या जाणाऱ्या बाधितांमध्ये तीव्र लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह, गृह विलगीकरणातील मात्र ऑक्सिजनची गरज आहे असे, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हॉस्पिटल यांच्याकडून संदर्भांकित रुग्ण या तीन परिस्थितीतील रुग्णांसाठी महापालिकेच्या हेल्पलाईनकडून सीओईपी जम्बो सेंटरच्या सहाय्याने बेड निश्चित करण्यात येईल.

 

लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना गृह विलगिकरणात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. मात्र या ठिकाणी रुग्णांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. संशयित करोना रुग्णांना तीव्र लक्षणे असल्यास त्यांची अँटिजेन चाचणी केली जाईल. किंवा या परिस्थितीत स्वॅबची आरटीपीसीआर चाचणी घेतल्यानंतर रुग्णांना संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. तसेच चाचणीचे निष्कर्ष येईपर्यंत लक्षणांच्या अनुषंगाने उपचार केले जाणार आहेत.  पॉझिटिव्ह आढळल्यास ट्राएज रुममध्ये डॉक्टर रुग्णांना स्थिर करून पुढील उपचारांची रुपरेषा ठरवली आहे. नोंदणी करून रुग्णांना संबंधित वॉर्डमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

येथे साधावा संपर्क

पुणे महापालिकेच्या 020-25502110 या हेल्पलाइनला रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा. तेथून सीओईपी जम्बो कोविड सेंटरशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत संपर्क केला जाईल. त्यामध्ये करोनाबाधित रुग्णांचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

 

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ज्यांना निरीक्षणाखाली ठेवून उपचार करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांना प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रवेश देण्यासाठी सर्वत्र स्वीकारली जाणारी ही केंद्रीय पद्धत अवलंबण्यात येत आहे. नागरिकांनी ही पद्धत अवलंबल्यास व्यवस्थापन करणे सोपे जाणार आहे. शनिवारी जम्बो रुग्णालयात 51 नवीन करोना बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यात आले.

– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.