रुग्णालयाचे पैसे भरले नाहीत म्हणून मृतदेहाची हेळसांड सुरूच

पुणे – रुग्णालयाचे पैसे भरले नाहीत म्हणून जिवंत व्यक्तींबरोबर आता मृतदेहाचीही हेळसांड खासगी रुग्णालयांनी सुरू केली आहे. त्यातून पुण्यातील पंचतारांकित रुग्णालयाने पूर्ण पैसे भरले नाहीत, म्हणून करोनाने मृत्युमुखी पडलेल्या 68 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेहच नातेवाईकांकडे सुपूर्त करण्याला नकार दिला आहे. “पैसे भरा आणि मृतदेह घेऊन जा,’ असे त्यांना सांगण्यात आले आहे. शनिवारी सकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे.

 

करोना पॉझिटिव्ह या वृद्धेस नातेवाईकांनी या रुग्णालयात दि.24 ऑगस्ट रोजी दाखल केले होते. यावर उपचारांचे बिल 8 लाख 27 हजार 297 रुपये करण्यात आले. नातेवाईकांनी सुरूवातीला मेडिक्लेमचे 2 लाख 25 हजार रुपये भरले. त्यानंतर रुग्णालयाच्या सांगण्यावरून आणखी 2 लाख 23 हजार रुपये भरले.

 

परंतु वृद्धेचा मृत्यु झाल्यानंतर महापालिका बिलातील केवळ 12 हजार रुपयेच कमी करू शकली. अद्याप 3 लाख 29 हजार 945 रुपये भरायचे आहेत. “त्यातील थोडेफार पैसे भरतो’ असे नातेवाईकांनी सांगितले, परंतु “पूर्ण पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यातच देणार नाही,’ असे सांगण्यात आले. याशिवाय “पैसे पूर्ण भरा, मृतदेह घेऊन जा आणि नंतर परताव्याची प्रक्रिया तुम्ही करा’ असेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

“रुग्णालय व्यवस्थापनाशी बोलायचे आहे,’ अशी विनंती वारंवार नातेवाईकांनी केली, परंतु त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. याशिवाय लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील अधिकारी यांच्याशीही त्यांची बोलण्याची तयारी नाही. “केवळ पैसे भरा’ असा एकच हेका व्यवस्थापनाचा आहे. सकाळी मृत झालेल्या महिलेचा मृतदेह संध्याकाळपर्यंतही नातेवाईकांच्या हाती देण्यात आला नाही.   दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.’

नातेवाईक म्हणतात…

ज्यांचा मृत्यू झाला त्या माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत. प्रक्रिया पूर्ण करा, पूर्ण पैसे भरा आणि नंतर क्लेम, परताव्यासाठी प्रयत्न करा, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले, अशी माहिती पुष्कर अष्टेकर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.