मेलबर्न – इंग्लंड संघापाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाच्या संघातही करोनाची एन्ट्री झाली आहे. ऍशेस कसोटी मालिकेत तिन सामने जिंकत ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच जिंकली आहे मात्र, दोन्ही संघातील सपोर्ट स्टाफ व त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंजाज ट्रॅव्हिस हेड याचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे संघातील अन्य खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफलाही धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वी इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफ करोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, आता संघातील खेळाडूलाच करोनाची बाधा झाल्याने अशेस कसोटी मालिकेलाही धोका निर्माण झाला आहे.
ट्रॅव्हिस हेड या मालिकेत भरात असून त्याने गाबा कसोटीत 152 धावांची खेळी केली होती. त्याने या मालिकेत आतापर्यंत तीन सामन्यात 248 धावा केल्या आहेत. यात एका शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
ऍशेस मालिकेत आधी इंग्लंड क्रिकेट संघाला याचा फटका बसला. इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफ आणि काही कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. ही बाधितांची संख्या सात झाली आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक सिल्वरवूड करोनाने बाधित झाल्याचे गुरुवारी समोर आले. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.