मेलबर्न – विश्वकरंडक टी-20 स्पर्धेच्या तयारीसाठी भारतात भारतीय संघाबरोबर टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे फटका बसला आहे. भारतात दाखल होण्यापूर्वीच मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व मार्कस स्टोनिस यांनी दुखापतीमुळे भारताच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी तयारीचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. ही मालिका येत्या 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श, मार्कस स्टोनिस यांनी माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या संघात नाथन एलिस, डेनियल सॅम्स व सीन अबॉट यांची स्टार्क, मार्श व स्टोनिस यांच्या जागी वर्णी लागली आहे.
ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून, या मालिकेतील पहिला सामना येत्या 20 सप्टेंबरला मोहालीत, दुसरा सामना 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये तर तिसरा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद येथे होणार आहे.