गुलाबराव पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई : युती सरकारच्या काळात माझ्या हाती चिमण्या मारण्याची बंदूक देण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हाती बॉम्ब दिला आहे, असे मत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. तत्कालिन युती सरकार आणि महाविकास आघाडीचे सरकार यामध्ये मोठा फरक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्रिमंडळात जी संधी आपल्याला देण्यात आली आहे त्याचे सोने करू असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतही वक्तव्य केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. निवडणुकीत आम्ही आमचे संख्याबळ सिद्ध करून दाखवू. निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल. खडसे हे सध्या आमच्या संपर्कात असून किती नेते संपर्कात आहेत हे आता सांगू शकत नाही. पण जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे, असेही पाटील म्हणाले.