वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने आता बहरिननेही इस्रायलबरोबरचे संबंध सर्वसामान्य करण्यास मान्यता दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू आणि बहरिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्यात समेट घडवून आणल्याची घोषणा केली. महिन्याभरापूर्वीच संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायलमधील संबंधही याचप्रमाणे सुरळीत करण्यात आले होते. युएई आणि इस्रायलच्या नेत्यांमध्ये पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये एका शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
त्याच धर्तीवर इस्रायल आणि बहरिनमध्येही शांतता चर्चेला यश आले आहे. नेत्यान्याहू आणि अल खलिफा यांनी आपापसातील मतभेद मिटवण्यास मान्यता दिली आहे. बहरिनकडून इस्रायलबरोबर मुत्सदी पातळीवरील संबंध प्रस्तापित केली जाणार आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये ओव्हल कार्यालयात पत्रकारांबरोबरच्या वार्तालापादरम्यान दिली.
दोन्ही देशांमध्ये आता परस्परांचे दूतावास उघडले जातील आणि राजदूतही नियुक्त केले जातील. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू होईल. तसेच आरोग्य, उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि शेती आदी अनेक क्षेत्रांमधील सहकार्यासही सुरुवात होईल. ही एक ऐतिहासिक घडामोड आहे. गेल्या 72 तासांमध्ये इस्रायलबरोबर दोन शांतता करार झाले आहेत. आणखीही काही देश असेच करतील. पॅलेस्टाईनलाही कदाचित तसेच करावेसे वाटत असावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ट्रम्प यांचे जावई आणि विशेष सल्लागार जेरेड कुश्नर यांनी मध्यपूर्वेतील या दोन्ही प्रमुख करारांसाठी पुढाकार घेतला आहे. ट्रम्प यांच्या सामर्थ्याने आणि शांतीच्या धोरणामुळे जगात अधिक चांगले बदल घडले आहेत, असे इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड फ्रेडमॅन म्हणाले.