पुणे : कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे कानाडोळा

आरोग्य यंत्रणा बिनधास्त ः “हायरिस्क’ असलेल्यांची काळजी नाही
पिंपरी (प्रतिनिधी) –
गेल्या सहा महिन्यांपासून करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दिवसेंदिवस शहरातील रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दररोज सरासरी एक हजार रुग्ण आढळत आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोध घेऊन त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग जर वेळच्या वेळी केले तर बऱ्याच अंशी करोनाला आटोक्‍यात आणणे शक्‍य होईल.

करोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन कमी पडत आहे. त्याला अपुरे मनुष्यबळ व पाच महिन्यांत आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण हे कारण असले तरी करोना काळात या बाबींकडे दुर्लक्ष केल्यानेच करोना वाढला असल्याची चर्चा आहे. करोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने होत असतो. यासाठी अंमलबजावणी यंत्रणेमध्ये समन्वय आवश्‍यक आहे. ज्या भागात बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्या भागातील मनपा दवाखान्यामार्फत त्वरित उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. हायरिस्क रुग्णांशी संवाद साधणे, त्यांना स्वॅब देण्यासाठी पाठविणे. त्यांना मनपा दवाखान्यात घेऊन जाणे आवश्‍यक आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.

रुग्णांबाबत प्रशासन बेफिकीर
ज्या रुग्णांची घरी सोय आहे अशा रुग्णांना घरी आयसोलेट केले जात आहे. या रुग्णांना 18 दिवस सक्तीने एकाच खोलीत रहावे लागत आहे. या रुग्णांचा खोलीचा दरवाजा सील करावा. त्यांच्या घराला याविषयीचे फलक लावावे. यासह अन्य महत्त्वाचे निर्देश आहेत. मात्र, अशा संक्रमित व्यक्‍तींच्या घराला फलक लावले जात नाही. त्यामुळे रुग्णांविषयी परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत. गृह विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यापासून करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना माहितीसाठी फोन केल्यावर ते फक्त घरातल्या व्यक्तींची नावे सांगतात. वारंवार फोन केला तर त्यांची चिडचिड होते. त्यामुळे सतत फोन करून माहिती घेता येत नाही.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.