प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांचा सवाल
आंबेगावात गेल्यावर्षीची पुनरावृत्ती होण्याची भीती
संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच मुसळधार पावसाने आंबेगाव परिसरात ओढ्याला महापूर आला होता. यात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. गेल्यावर्षीच्या घटनेतून प्रशासनाने काहीही बोध घेतला नसल्याने ओढ्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे पावसाचे तांडव सुरूच राहिल्यास पुन्हा महापूर येण्याची वाट पाहताय का, असा संतप्त सवाल आंबेगाव बु. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.
पुणे शहर, उपनगरांत गेली आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आंबेगाव परिसरातील जांभूळवाडी तलावदेखील पूर्णक्षमतेने भरला आहे. तलावापासून वाहणारा ओढा आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे, वडगावमार्गे नदीला मिळतो. तलावातून होणारा विसर्ग व मुसळधार पावसामुळे हा ओढा दुथडी भरून वाहत आहे. पण, या ओढ्याची गेली कित्येक वर्षे स्वच्छता झालेली नाही. ओढ्यावर कोठेही संरक्षक कठडे बांधलेले नसल्यामुळे ओढ्यातील पाणी अनेक सोसायट्यांमध्ये शिरत आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ओढ्याने रुद्रावतार धारण केल्याने आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे या भागात पूर आला होता. अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले होते. यात काही नागरिकांनी जीव गमावला होता. अनेक वाहनेही वाहून गेली होती; परंतु त्यानंतरही प्रशासनाने कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा सवाल केला जात आहे.
तेरा वर्षांपूर्वी केले होते काम
सदर ओढ्यावर शासनाचा योजनेतून तत्कालीन नगरसेवकांनी काही भागात काम केले होते. त्यानंतर मात्र आजअखेर कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
आंबेगाव, जांभूळवाडी परिसर पुणे शहराजवळचा भाग असल्यामुळे येथे लोकवस्ती सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी ओढ्यालगत बांधकामे झाली आहेत. गेली तीन वर्षे सदर ओढ्यावर संरक्षण कठडे बांधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रशासनाने लक्ष घालून नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे.
– युवराज बेलदरे, नगरसेवक.
मागील वर्षी पुरामुळे जीवितहानी तर झालीच. शिवाय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने या ओढ्याची पाहणी करून उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
– अनिल कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बुद्रुक