मुंबई – भारतात उगम पावलेला हिंदू धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन धर्म मानला जातो. हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्ती आपल्या इष्ट देवतेची पूजा आणि उपासना करण्यासाठी मंदिरात जातात. त्यामुळे भारतसह जगभरात लाखो मंदिरे आहेत.
या मंदिरांत पूजा करण्यासाठी आणि व्यवहार पाहण्यासाठी पुजारी नेमलेले असतात. आता मुंबई विद्यापीठात लवकरच ‘मंदिर व्यवस्थापन’ विषयाचा सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि मास्टर डिग्री अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मुंबई विद्यापीठातील सेंटर फॉर हिंदू स्टडीज आणि संस्कृत विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजचे संचालक शौनक ऋषी दास आणि मुंबई विद्यापीठातील सेंटर फॉर हिंदू स्टडीजचे संचालक रवींद्र सांगुर्डे यांनी या करारावर सह्या केल्या आहे.
प्रा. सांगुर्डे म्हणाले, या करारानुसार, विद्यापीठातील दोन विभाग ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत संयुक्त अभ्यासक्रम विकसित करतील. त्यामध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन अभ्यासक्रमाचा समावेश असेल. यात विद्यार्थ्यांना मंदिर व्यवस्थापनातील विविध पैलू शिकण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम असेल.
तसेच हिंदू तत्त्वज्ञानाच्या समग्र अभ्यासावर भर देईल. या अभ्यासक्रमामध्ये गर्दी व्यवस्थापन आणि कार्यक्षम निधी प्रशासन हाताळण्याच्या शिक्षणासोबतच शाळा आणि रुग्णालये बांधण्यासारख्या सामाजिक उद्देशांचाही समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली.