न्यूयॉर्क – अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील एका हिंदू मंदिरावर भारतविरोधी ग्राफिटी रंगवल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार द्वेष पसरवण्याच्या हेतूने करण्यात आल्याचे गृहित धरून पोलिसांनी या प्रकाराचा तपास करायला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता हा प्रकार उघड झाला. श्री स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहील्याचे आढळून आले आहे, असे कॅलिफोर्नियातील न्यवार्क शहराच्या पोलिसांनी म्हटले आहे.
हा प्रकार समजल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर व्यवस्थापनाची भेट घेतली, मंदिराच्या व्यवस्थापनाला धमकावण्याच्या हेतूने ही ग्राफिटी रंगवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सॅन् फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील कॉन्सलेट जनरलनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकारामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा त्वरित तपास करावा आणि दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी केल्याचे कॉन्सुलेट जनरलनी एक्सवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे.
मालमत्तेची नासधूस, छळ, धमकावणे किंवा द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने केलेले सर्व गुन्हे गंभीर गुन्हे मानले जातात. या गुन्ह्यांच्या तपासासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.
त्यामुळे दोषींना शोधून त्यांना शिक्षा करण्यासाठी आजूबाजूच्या सीसीटिव्हीचे चित्रीकरण एकत्र केले जात आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. स्थानिक हिंदूंनी एकत्र रहावे आणि या प्रकाराविषयी अधिक तपासाला उपयुक्त माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
हिंदू मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून अशाप्रकारे भारतविरोधी ग्राफिटी रंगवली जाण्याचा हा पहिला प्रकार नाही. भारतविरोधी द्वेष पसरवणाऱ्या खलिस्तानींवर कारवाई करण्याची मागणी अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाकडे सातत्याने केली जाते आहे. जुलै महिन्यात सॅन् फ्रान्सिस्को येथील भारताचा वाणिज्य दूतावास पेटवून देण्याचा प्रयत्न खलिस्तानवाद्यांनी केला होता.
ग्राफिटीमागे खलिस्तानवाद्यांचा हात
मंदिराचे नामनिर्देशन करणाऱ्या बोर्डावर मंदिराच्या नावापुढे खलिस्तान असे स्प्रे द्वारे रंगवण्यात आले होते. याशिवाय मंदिराच्या भिंतींवर काही आक्षेपार्ह मजकूर देखील रंगवण्यात आला होता. त्यावरून या उद्योगामागे खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट होते आहे.
खलिस्तानी विभाजनवादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येचा कट उघड झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. त्या पार्श्वभुमीवर मंदिराच्या विद्रुपीकरणाचा हा प्रकार घडला आहे.