कोलकाता, दि. 19- करोना व्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड19 या महामारीचा प्रकोप आता कमी होत आहे. “अनलॉक6′ प्रक्रियेत देशभर आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस खुली झाली असली, तरी बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यास अजूनही नागरिक कचरत आहेत. अशातच तरिही बाहेरचे काही खायचे/प्यायचे झाल्यास प्रत्येकाला मास्कचा अडथळा जाणवतो. म्हणून कोलकता येथील एका रेस्टॉरंट मालकाने झिप (चेन) असलेले मास्कस ग्राहकांना द्यायला सुरुवात केली आहे.
झिप मास्कमुळे, मास्क न काढता नागरिक खाद्यपदार्थांचा अथवा पेयांचा आस्वाद घेऊ शकत असल्याने, या रेस्टॉरंट मालकाच्या कल्पनाशक्तीला ग्राहक दाद देताना दिसत आहेत. यामुळे हे रेस्टॉरंट चर्चेचा विषयही झाले आहे.
साधारणपणे मार्च महिन्यापासून कोव्हिड19 चा वेग देशभर वाढला होता. या जागतिक महामारीत हजारो नागरिक मृत्युमुखी पडले तर लक्षावधी रुग्ण निर्माण झाल्याने सरकारने देशभर कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे चारहून अधिक महिने घरातच अडकलेले नागरिक हॉटेलचे खाण्यास उत्सुक दिसत होते. “अनलॉक6′ अंतर्गत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस सुरु झाली तरी त्यास पूर्वीइतका प्रतिसाद नव्हता.
ही सर्व परिस्थिती पाहता, कोलकता येथील एक थिम रेस्टॉरंट मालक, सोमोश्री सेनगुप्ता यांनी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना झिप मास्क देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपोआपच ग्राहकांची गर्दी वाढू लागली. शिवाय या उपहारगृहाची शहरात मोठी चर्चाही झाली.
याबाबत सेनगुप्ता यांनी सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांना झिप मास्क पुरवणे सुरु केल्याने ग्राहक समाधानी आहेतच; शिवाय आम्ही या मास्कसाठी कोणतेही वेगळे शुल्क ग्राहकांना आकारलेले नाही. शिवाय आम्ही देऊ तेच मास्क वापरण्याचेही बंधन ठेवलेले नाही. मात्र, झिप मास्क दिल्याने मास्क न काढताही ग्राहकांना खाद्य-पेयांचा आनंद घेता येत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.