सातारा – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेची नोंद न करणाऱ्या जिल्ह्यातील सहा शाळांना प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी नोटीसा बजावल्या. याबाबत तात्काळ खुलासा करुन आरटीईची नोंदणी न केल्यास प्रसंगी समिती नेमून शाळा मान्यता रद्द करण्याबाबचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे नोटीसीत म्हटले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील 217 शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत. 211 शाळांनी याबाबत नोंदणी केली आहे. फक्त सहा शाळांनी नोंदणी केली नाही ही बाब गंभीर आहे. याबाबत लवकरच समिती गठित करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा