पुणे : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. हा मुहूर्त साधत मंगळवारी शहर विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने 45 प्रेमी जोडप्यांनी लग्नगाठ बांधली.
दि.14 फेब्रुवारी या दिवशी लग्न करण्यासाठी सुमारे एक-दीड महिन्यांपूर्वीच पूर्व नोंदणी शहर विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात आली आहे. नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात.
विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रियाही नसल्याने नोंदणी करून विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली.