पुणे- लॉकडाऊनचा फटका नोटरींचे कामकाज करणाऱ्या वकिलांना बसला आहे. जवळपास 95 टक्के नोटरीचे काम बंद आहे. यामुळे या वकिलांपुढे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. कित्येकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे.
कोर्ट, कचेरी, दुय्यम सहनिबंधक कार्यालये आणि इतर सर्व सरकारी कार्यालये, आस्थापना बंद असल्याने जवळजवळ नोटरींची सर्वच कामे बंद आहेत. शहर आणि जिल्ह्यात पूर्वीपासूनचे 2 हजार आणि लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी 400 नवीन नोटरी झाले आहेत. या सर्व वकिलांचे कामकाज बंद असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ऍड. यशवंत उर्फ बाळासाहेब खराडे यांनी दिली.
“नोटरींचे कामकाज बंद ठेवण्याचे केंद्र, राज्य सरकार किंवा विधी मंत्रालयाचे आदेश नाहीत. त्यामुळे नोटरींनी कार्यालयातून वा इमर्जन्सी असेल तरच घरातूनच आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून गर्दी न होऊन देता कामकाज करण्यास हरकत नाही. मात्र, शासकीय ट्रेझरी बंद असल्याने स्टॅम्प पेपर्स तसेच नोटरियल तिकिटे उपलब्ध होत नाहीत.
टायपिस्टही मिळत नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. तर नवीन नोटरींना रजिस्टर्स, नोटरी रिसिप्ट बुक व शिक्के बनवून मिळत नसल्याने उत्पन्नाचे साधनच बंद आहेत. केवळ 5 टक्के नोटरी ज्यांच्याकडे तिकीटे, स्टॅम्प व टायपिस्ट आहेत. त्यांचे अंशत: कामकाज सुरू आहे,’ असे ऍड. खराडे यांनी सांगितले.
या परिस्थितीत महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन गरजू नोटरींना अन्नधान्य व भाजीपाला कीटची मदत करत आहे. जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये आता सुरू होणार आहेत. त्यामुळे या अडचणी थांबण्याची चिन्हे आहेत.
कोट
करोनाच्या परिस्थितीमुळे केंद्रीय विधी मंत्रालयाला निवेदन देण्यात येणार आहे. तिकिटाचे दर कमी करावेत. नोटरीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये 100 रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
– ऍड. यशवंत खराडे, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन.