लॉ अँड ऑर्डर नव्हे, लॉ आउट ऑफ ऑर्डर

रस्त्यावर पोलीस जीप उभी करत ज्युसचा आस्वाद; पोलिसांनी तरी नियम पाळावेत नागरिकांची अपेक्षा
कोथरुड मधील प्रकार

अमाेल साबळे/कोथरुड: कोथरूड वाहतूक पोलिसांकडून मागील आठवड्यात कर्वे पुतळा चौक परिसरातील पदपथावर व रस्त्याच्या कडेने डबल लाईन मध्ये पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर अचानकपणे केलेल्या कारवाईची चर्चा सध्या सुरू आहे. पण याच चौकातील एका हॉटेल समोर अर्ध्या रस्त्यात पोलीस जीप उभी करून अधिकारी गाडीतच ज्यूस पिताना निदर्शनास आल्याने सर्वसामान्य नागरिकांनी यातून काय बोध घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुंपणच शेत खात असेल तर दोष कोणाला द्यायचा असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.

सध्या या ठिकाणी अधून-मधून पोलीस कारवाई चालू असली तरी दोन दिवसापूर्वी कर्वे पुतळा चौकातील एका हॉटेल समोरील रस्त्यावरील डबल पार्किंग च्या बाहेर कोथरूड पोलीस स्टेशनची एक जीप उभी होती त्यातील अधिकाऱ्यांनी हॉटेलमधून ज्यूस मागवून तो गाडीतच प्याला. ही गोष्ट आजूबाजूला उभ्या असणाऱ्या नागरिकांनी पाहिल्याने त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू झाली. याठिकाणी जर आता वाहतूक पोलीस असते तर त्यांनी या पोलिस अधिकाऱ्यांच्या जीपवर कारवाई केली असती का असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. एकदाच नाही तर वारंवार हा प्रकार पाहण्यास मिळत असल्याचे सांगितले जात आहे. किमान नागरिकांना नियम शिकवत असताना पोलिसांनी तरी ते पाळावेत अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

कोथरुड वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून कर्वे पुतळा चौक परिसरात पदपथावर दुचाकी व रस्त्याच्या कडेने डबल लाईन मध्ये चार चाकी वाहने लावली जात होती मागील आठवड्यात अचानक पणे कोथरुड वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी कारवाई सुरू करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता सलग कारवाई केल्याने पदपथावर लावण्यात येणाऱ्या दुचाकींची संख्या कमी झाली असली तरी रस्त्यावर दुचाकींच्या नंतर डबल लाईन मध्ये चार चाकी वाहने लावली जात आहेत या चार चाकी वाहनांच्या बाहेरही रस्त्यावर काही वाहने उभी केली जातात शनिवार व रविवारी येथील परिस्थिती आणखीच भयानक असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.