नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. आता पुन्हा एकदा किम जोंग उन यांची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे. किम जोंग ऊन हे सध्या कोमामध्ये असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची बहिण किम यो जोंग या राष्ट्राची धुरा आपल्या हाती घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यानंतर एका प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांसमोर येऊन त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. “आपल्या माहितीनुसार किम जोंग उन हे सध्या कोमाममध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत देशाची धुरा त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळत आहेत,” अशी माहिती दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी कोरियातील एका माध्यमाशी बोलताना दिली. मिन यांनी यापूर्वी दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम देई जुंग यांच्यासोबत त्यांचे विशेष सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. सत्ता सांभाळण्याची किम यो जोंग यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी किम जोंग उन यांच्यासोबत काम केले आहे.
“आतापर्यंत किम यो जोंग यांच्या हाती संपूर्ण सत्ता सोपवण्यात आली नाही. नेतृत्वाचे संकट अधिक काळासाठी सुरू राहू नये आणि सरकार चालवण्यातील अनेक गोष्टी त्यांना समजाव्या म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे,” असेही मिन यांनी सांगितले. किम यो जोंग या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती गेल्या महिन्यात समोर आली होती. दरम्यान, किम जोंग उन यांनी किम यो जोंग यांना आतापर्यंत आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केले नाही.
उत्तर कोरियामध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालीवर दक्षिण कोरिया नजर ठेवून आहे. ज्यावेळी किम जोंग उन हे कोमात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर दक्षिण कोरियातील गुप्तचर यंत्रणेची एक बैठक पार पडली. किम यो जोंग यांच्या हाती सत्ता आल्याच्या वृत्तात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. किम यो जोंग या यापूर्वीपासून किम जोंग उन यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.