पुणे – वर्गमित्राने ऑस्ट्रेलियात नोकरी लावतो, असे सांगून तेथे फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला 18 लाख 70 हजारांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी राजेंद्र अवसरे (वय.54, रा. महर्षीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जकीउल्लाह पारकर (वय.52, रा. देहरादून, उत्तराखंड) याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला. गुन्हा दाखल झालेला आरोपी पारकर हा सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात देहरादून येथील सेंट्रल कारागृहात बंदीवान आहे.
फिर्यादी व आरोपी हे 1984 साली शहरातील एका नामांकित विद्यालयात कला शाखेत शिकत होते. 2018 मध्ये त्यांची पुण्यात भेट झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादींना ऑस्ट्रेलियात नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत आपल्या जाळ्यात खेचले. मात्र, नोकरी करण्यासाठी तेथे स्थावर मालमत्ता असणे गरजेचे आहे, असे सांगितले. फिर्यादींना विश्वास वाटावा म्हणून आरोपीने ऑस्ट्रेलियात 75 लाख रुपयांला फ्लॅट बुक केला असून त्यासाठी काही रक्कम दिली आहे. बाकी राहिलेले पैसे तुला भरावे लागतील असे म्हटले. आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर घराचा एक फोटोदेखील पाठवला.
फिर्यादींना विश्वास वाटल्यामुळे त्यांनी शहरातील आपली मालमत्ता विकून आरोपीला फ्लॅट घेण्यासाठी 22 लाख 20 हजार रुपये दिले. त्यानंतर तो फ्लॅट ऑस्ट्रेलियात भाड्याने दिला असल्याचे सांगून आरोपीने वेळोवेळी फिर्यादींच्या खात्यावर साडेतीन लाख रुपये पाठवले. मात्र, राहिलेले 18 लाख 70 हजार रुपये त्यांना दिले नाहीत. मात्र, जेव्हा फिर्यादींनी आरोपीला आपण ऑस्ट्रेलियाला कधी जाणार आहोत याची विचारणा केली तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
दरम्यान, याच कालावधीत आरोपीने फिर्यादींना देहराडून येथे संगणक व व्यक्तीमत्व विकासाचा एक कोर्स करायला लावला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात गुन्हा दाखल केला.