रेडा -औषध दुकानाचा संचालक औषध निर्माणशास्त्र पदवी घेणारा नसला तरी चालेल. परंतु रुग्णांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरने लिहून दिलेली औषधाची चिठ्ठी व त्यावरील औषधांची विक्री फार्मासिस्टच्या देखरेखीखाली झाली पाहिजे, असा नियम आहे. सर्व नियमांना पायदळी तुडवत फार्मासिस्टकडून त्यांचा औषध विक्रीचा परवाना भाड्याने घेऊन विना फार्मासिस्ट औषध दुकान चालवण्याचा गोरखधंदा इंदापूर तालुक्यात जोरदार सुरू आहे. याकडे अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे रुग्णांचा जीवदेखील गेल्याची उदाहरणे आहेत.
इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. हजारो रुग्णांना उपचाराकरिता जवळच्या गावात जावे लागते. मेडिकलची संख्या मोठी आहे. मात्र, ही औषधे दुकाने वेगळ्याच प्रकारे चाललेली दिसतात. स्वतःच्या मालकीचे औषध विक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी डी फार्मसी अथवा बी फार्मसी पदवीधारक आपला परवाना केवळ आर्थिक स्थिती मजबूत नसल्यामुळे हा औषध परवाना 10 ते 15 हजार रुपये महिना भाड्याने देत आहेत.
औषध विक्री करणारे लोक रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. इंदापूर शहरात निमगाव केतकी व भिगवण शहरात दर्जेदार औषधे रास्त किमतीत विक्री करणारी औषधे दुकाने आहेत. तीन वर्षांपासून बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर ठोस कारवाई झालेली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग इंदापूर तालुक्यामध्ये लक्ष देणार का, असा सवाल सूज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे.