ठोसेघर – सातारा-धावली या एसटीबसचा शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ब्रेकफेल होऊन धावली गावच्या हद्दीत अपघात झाला. या अपघातात महिला वाहक रेश्मा पंढरीनाथ चोपडे या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, एसटीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी, सातारा आगाराची सातारा-धावली ही एसटी शनिवारी सकाळी साताराहुन कासमार्गे धावलीकडे निघाली होती. आठ वाजण्याच्या सुमारास ही एसटी धावली गावच्या हद्दीत आली असताना तीव्र उतरावर एसटीचा ब्रेकफेल झाला.
ही बाब चालकाच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत चालकाने एसटी रस्त्याकडेला असणाऱ्या खड्ड्यात घातली. एसटी खड्यात जोरात आदळल्याने काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली तर महिला वाहक रेश्मा चोपडे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.