पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन या घटकांसाठी मायनॉरिटी, तर उर्वरित सर्व घटकांसाठी 2014 पासून नॉन मायनॉरिटी हा शब्द वापरण्यात येत आहे. याची माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने दिले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा अर्जात मायनॉरिटीच्या वर्गीकरणात हिंदू शब्द वगळून नॉन मायनॉरिटीचा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर निषेधाचे मेसेज व्हायरल झाले. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने खुलासा प्रसिद्ध केला. हिंदू शब्दाऐवजी नॉन मायनॉरिटी हा शब्द 2014 पासून वापरण्यात येत असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळाच्या वतीने परीक्षांचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असते. या अर्जात मायनॉरिटी रिलीजन यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन असे धर्म नमूद केले आहे. यात हिंदू धर्माचा स्वतंत्रपणे उल्लेख नाही. त्याऐवजी नॉन मायनॉरिटी असा उल्लेख आहे. त्यासंदर्भात बोर्डाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जात शाळा व महाविद्यालयांमार्फत भरून घेण्यात येत आहे.
परंतु, केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा तपशील मंडळाकडे मागितला होता. त्यामुळे मंडळाच्या परीक्षा समितीच्या दि. 7 सप्टेंबर 2013 च्या सभेत हा शब्दाचा समावेश आहे. त्यात अन्य घटकांतील विद्यर्थ्यांना माहिती भरण्यासाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना उपलब्ध करून दिला आहे. त्याचा उपयोग अल्पसंख्यांक विभागाच्या माहितीसाठी करण्यात येतो, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.