पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होत आहे. याचे प्रवेशपत्र अर्थात हॉलतिकीट दि. 3 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटची प्रिंढ काढून द्यावीत, अशा सूचना दिल्या आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटींग करताना त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. त्या प्रिंटआऊट हॉलतिकीटवर मुख्याध्यापक तथा प्राचार्याचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
हॉलतिकीटात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. हॉलतिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी संबंधित सूचनांनुसार कार्यवाही करावी, अशा प्रकारच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.