पुणे – करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात असताना पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. मागील पंधरा दिवसांत चारशेच्या जवळपास सापडणारी बाधित संख्या एक हजारापर्यंत पोहोचली तरी स्क्रिनींगची संख्या वाढलेली नाही. सर्वेक्षण होत नाही. त्यामुळे तत्काळ यंत्रणा प्रभावीपणे राबवावी अशी मागणी सदस्यांनी स्थायी समिती बैठकीत केली. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखली स्थायी समितीची बैठक झाली.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, अंगणवाड्यांचे प्रलंबित बांधकामे, आयुषमान भारत योजनेतील गैरप्रकार या सारख्या विषयावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील आणि विरधवल जगदाळे यांनी करोना उपाययोजनांबाबतीत आरोग्य यंत्रणा थंड पडले असून, चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
एकीकडे प्रशासन दुसरी लाट येणार आहे, असे सांगते. मात्र, दुसरीकडे कोविड केअर सेंटर्स बंद आहेत. प्रतिबंध क्षेत्राबाबत नागरिकांना कुठलीच माहिती नसते. एखादा रुग्ण आढळला तर त्याचे कॉटॅक्ट ट्रेसिंग होत नाही. त्याचा फटका आपल्यालाच बसणार आहे. या ढिसाळ कारभारामुळे प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. नमुने तपासणीची संख्या वाढवावी. त्यावर अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी करोनाबाबतीत जागृती करत दोन हजारांवर होत असलेली चाचणी संख्या अडीच हजारांपर्यंत असावी, असा सूचना दिल्या. राज्य शासनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे.