इस्लामाबाद – पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. अवमान प्रकरणी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्याबरोबर माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्याविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.
निवडणूक आयोगाबाबत अयोग्य भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने या दोघांसह असाद उमर यांच्याविरोधात गेल्या वर्षी अवमान विषयीची कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. इम्रान खान आणि चौधरी यांच्याविरोधातील वॉरंटचे आदेश निवडणूक आयोगाच्या 4 सदस्यीय पिठाने आज बजावले.
हे दोघेही यापूर्वीच्या सुनावणीला उपस्थित राहिलेले नव्हते. इम्रान खान यांच्याविरोधात अनेक प्रकरणांचे खटले न्यायप्रविष्ट आहेत. ते पंतप्रधान असताना आणि नंतरच्या काळातही त्यांच्याविरोधात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.