Most Century In First Class Cricket : क्रिकेटच्या खेळात अनेक दिग्गजांनी नाव कमावले आहे. तथापि, क्रिकेटर एकतर खूप शतके करून किंवा भरपूर विकेट्स घेऊन सर्वाधिक प्रसिद्धी मिळवतो. उदाहरणार्थ, जर एखादा फलंदाज असेल तर त्याने किती धावा केल्या आणि किती शतके केली, हे सर्वात महत्त्वाचे आहे. गोलंदाजाच्या बाबतीतही असेच घडते. त्या बॉलरने किती विकेट्स घेतल्या हे सगळे पाहतात. आजच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली, जो रूट आणि केन विल्यमसन यांच्यापेक्षा मोठे नाव नाही. त्यांच्या आधी डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पाँटिंगसारखे क्रिकेटपटू होते, ज्यांच्या महानतेला आजही संपूर्ण जग सलाम करते. परंतु जगात असा एक फलंदाज आहे ज्याने क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आणि स्वतःचा इतिहास लिहिला. ज्याची बरोबरी ब्रॅडमन, सचिन किंवा लाराही करू शकले नाहीत. या क्रिकेटरचे रेकॉर्ड पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घ्या कोण आहे हा ताकदवान फलंदाज?
18व्या शतकात जॅक हॉब्स नावाचा इंग्लंडचा एक स्फोटक फलंदाज होता. कदाचित बहुतेक लोकांना हे नाव माहित नसेल. हॉब्जचा इतिहास वाचलात तर थक्क व्हाल. क्रिकेटमध्ये त्याने जो पराक्रम केला आहे, तो आजपर्यंत कोणीही करू शकले नाही. कदाचित हे पुन्हा कधीही होणार नाही. क्रिकेटच्या जगात आजवर अनेक विक्रम झाले आहेत पण जेकब हॉब्सने जे केले ते कोणीच करू शकत नाही.
आज आपण जॅक हॉब्ससह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत. क्रिकेट जगात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जॅक हॉब्सच्या नावावर आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 61 हजार 760 धावा केल्या आहेत. हा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने सर्वाधिक 199 शतके आणि 273 अर्धशतके केली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या फॉरमॅटमध्ये जॅक हॉब्ससह एकूण 25 फलंदाजांनी 100 हून अधिक शतके झळकावली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्यात एकही भारतीय नाही. या महान फलंदाजासमोर सर्व फलंदाज अपयशी ठरले आहेत. जॅक हॉब्सने क्रिकेट जगतात एक वेगळा इतिहास लिहिला आहे. हॉब्सने एकूण 834 सामने खेळले आहेत. हॉब्सची सर्वोच्च धावसंख्या 316 आहे. 1934 मध्ये हॉब्सने आपल्या कारकिर्दीतील शेवटचे 199 वे शतक झळकावले होते. यानंतर त्यांच्या करिअरचा आलेख थोडा खाली गेला आणि 1935 साली त्यांनी निवृत्ती घेतली.
हॉब्सचा जन्म 16 डिसेंबर 1882 रोजी झाला. हॉब्सचे आकडे बघून तुम्ही म्हणाल की संपूर्ण संघ जरी वर्षानुवर्षे एकत्र क्रिकेट खेळला तरी त्याच्या आकड्यांना हात लावता येणार नाही. हॉब्स यांनी 48 वर्षे सतत क्रिकेट खेळले. जेव्हा हॉब्स निवृत्त झाले तेव्हा ते म्हणाले की, “खूप काही करायचे आहे पण ते करू शकलो नाही.”
फर्स्ट क्लासमध्ये केवळ धावा आणि शतकांचा विक्रमच नाही तर सर्वात मोठ्या वयात शतक झळकावण्याचा पराक्रमही जॅक हॉब्सने केला आहे. हॉब्सने वयाच्या 46 व्या वर्षी इंग्लंडकडून कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. वयाच्या पन्नाशीपर्यंत हॉब्स क्रिकेट खेळत राहिले. या कारणास्तव त्याला ‘द मास्टर’ असे नाव देण्यात आले.
हॉब्सच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 61 सामने खेळले ज्यात त्याने 5,410 धावा केल्या. या काळात त्याने 15 शतकी खेळी खेळल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 56.94 होती. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 211 आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा मोठा क्रिकेटपटू कधीच झाला नाही, असे जागतिक क्रिकेटमध्ये मानले जाते. ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 234 प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात त्यांनी 28067 धावा केल्या. या काळात त्याने 117 शतके ठोकली तर त्याची सरासरी 95.14 इतकी होती. हॉब्स फक्त सरासरीच्या बाबतीत ब्रॅडमनच्या मागे होते. तर कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॅडमन यांनी 52 सामने खेळले ज्यात त्यांनी 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या. ब्रॅडमन यांच्या नावावर कसोटीत 29 शतके आहेत.
हॉब्स नंतर प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ईएच हेंद्रेन (EH Hendren) 170 शतके, हॅमंड (WR Hammond) 167 शतके, सीपी मीड (CP Mead) 153 शतके, जी बॉयकॉट (G Boycott) 151 शतके, एच सटक्लिफ (H Sutcliff) 151 शतके, एफई वूली (FE Woolley) 145 शतके, जीए हिक (GA Hick) 136, एल हटन (L Hutton) 129 शतके, जीए गूच (GA Gooch) 128 शतके, डब्ल्यूजी ग्रेस (WG Grace) 124 शतके, डीसीएस कॉम्प्टन (DCS Compton) 123 शतके, टीडब्ल्यू ग्रेव्हनी (TW Graveney 122 शतके, डीजी ब्रॅडमन (DC Bradman) 117 शतके, एमआर रामप्रकाश (MR Ramprakash) 114 शतके, आयव्हीए रिचर्ड्स (IVA Richards) 114 शतके, झहीर अब्बास (Zaheer Abbas) 108 शतके, ए सँडहॅम (A Sandham) 107 शतके, एमसी काउड्री (MC Cowdrey) 107 शतके, टीडब्ल्यू हेवर्ड (TW Hayward)104 शतके, जीएम टर्नर (GM Turner) 103 शतके, जेएच एडरिक (JH Edrich) 103 शतके, एलईजी एम्स (LEG Ames) 102 शतके, जीई टायल्डस्ले (GE Tyldesley) 102 शतके आणि डी एमिसने (DL Amiss) 102 शतके लगावली आहेत.
या विक्रमाच्या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर 42 व्या क्रमांकावर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 81 शतके आहेत. या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर 81 शतके आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज झहीर अब्बासच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 हून अधिक शतके आहेत.