एसटीच्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

बसमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव : फायर सिलिंडरची कमतरता

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील अनेक एसटी बसमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव आहे. अनेक गाड्यांमध्ये फायर सिलिंडर व प्रथमोपचार पेटी नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांश बसमध्ये सुरक्षेविषयी कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे.

एस.टी. ही राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असून गाव तेथे एसटी हे बिरूद एसटीने अगदी समर्थपणे पेलले आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळ सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कित्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली असून त्यामध्ये औषधोपचाराचे कोणतेही साहित्य दिसत नाही.

पुण्यात स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन या मध्यवर्ती एसटी स्थानकांतून दररोज हजारो बस ये-जा करतात. मात्र, बहुतांश एसटी बसमध्ये फायर सिलिंडरची कमतरता असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे एसटीला अचानक आग लागल्यास अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागते. राज्यातील अनेक गाड्यांमध्ये सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले नसून प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. गंभीर गुन्हे, चोरी अशा प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या गुन्ह्यांची उकल होऊ शकते किंवा एखादा गुन्हा होण्यापासून रोखला जाऊ शकतो. मात्र, अनेक बसमध्ये सीसीटीव्हीच बसविण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे.

शिवनेरी, अश्‍वमेधमध्ये सुरक्षिततेची उपकरणे
एसटीच्या ताफ्यात असणाऱ्या शिवनेरी, अश्‍वमेध या वातानुकूलित बसमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. या बसमध्ये फायर अलार्म, फायर सिलिंडर, प्रथमोपचार पेटी असल्याचे दिसून येते. मात्र, साधी एसटी (लाल एसटी), हिरकणीमधील बहुतांश बसमध्ये फायर सिलिंडर गायब असल्याने अनर्थ घडण्याची शक्‍यता आहे. यामुळे अचानक एसटी गाड्यांना आग लागल्यास ती विझविण्यासाठी प्रत्येक गाडीत संरक्षणात्मक साहित्य बसविण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.