बारामती – कोणीही जाणून-बुजून नोटीस देत नाही. फक्त काही जणांबद्दल बातम्या येतात. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचे काम करत असते. त्याला उत्तर दिले की तो विषय संपतो. या गोष्टीला कोणी वेगळे राजकीय स्वरूप देऊ नये. अशी माझी विनंती आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना सल्ला दिला.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी (दि. 1) दौरा पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो या कारखान्याला पर्यावरण विभागाची नोटीस आली आहे. याबाबत पवार म्हणाले, “मागच्या वेळी श्रीनिवास पवार यांच्या शरयू ऍग्रो या कारखान्याला नोटीस आली होती. आमच्याही काही युनिटला अशीच नोटीस आली होती. ही एक प्रक्रिया असते. कोणताही कारखाना चालवत असताना तसेच पर्यावरणाचा विचार करता, झिरो डिस्चार्ज विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर द्यावे.’