वाघोली – खासगी लॅबमध्ये केलेल्या करोना टेस्ट रिपोर्टमध्ये वाघोलीतील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर वाघोली परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. चौथा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आता चार दिवसांनंतर एकही नवा करोनाचा रुग्ण वाघोलीत सापडला नाही. पॉझिटिव्ह सापडलेल्या चौघांची प्रकृती स्थिर असून क्वारंटाइन करण्यात आलेल्यांच्या हातावर शिक्के मारले असून त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
वाघोली परिसरामध्ये खाजगी लॅबमध्ये केलेल्या करोना टेस्ट रिपोर्टमध्ये 15 एप्रिल रोजी पहिला रुग्ण पॉझिटिव्ह सापडला होता. याच अनुषंगाने केलेल्या 27 जणांच्या करोना टेस्ट रिपोर्टमध्ये 17 एप्रिल रोजी दोघेजण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर 19 एप्रिल रोजी आणखी एकजण पॉझिटिव्ह आढळला. सद्यस्थितीत वाघोलीत एकूण 4 करोना रुग्ण आहे. चौघांमध्ये करोनाची लक्षणे प्रकर्षाने जाणवत नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वाघोलीत आत्तापर्यंत करोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वाघोलीतील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घरीच राहणे गरजेचे आहे.
आणखी दोघांचे खासगी लॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
दोन दिवसांपूर्वी खासगी लॅबच्या करोना रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोणीकंद येथील तरुणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच याच तरुणाच्या संपर्कात आलेल्या 47 जणांची खासगी लॅबमध्ये केलेल्या करोना चाचणीध्ये दोघांचा आहवाल पॉझिटिव्ह आला आसल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. दोघांच्याही संपर्कात आलेल्याची माहिती गोळा करून त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
लोणीकंद परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी सुरू असून कडेकोट बंद पाळण्यात येत आहे. पहिला करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी लोणीकंद गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याठिकाणी मेडिकल, आरओ प्लांट वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.