पाथर्डी – माळीबाभूळगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शिक्षक कॉलनीतील एका सीआरपीएफच्या जवानाला घरात घुसून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी कॉलनीतील चार तरुणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी गोळीबार झाल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री घडली.
याप्रकरणी सीआरपीएफचे जवान मच्छिद्र चंद्रकांत बडे (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केतन जाधव, गौरव पांडुरंग पैठणकर, सागर ऊर्फ लल्ल्या पांडुरंग पैठणकर, राम पुंडलिक जाधव (सर्व रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांच्यावर घरात घुसून गंभीर मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवान बडे हे सुटीनिमित्त गावाकडे आले होते. माळीबाभूळगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शिक्षक कॉलनीतील डोंगराच्या कडेला असणाऱ्या वसाहतीमध्ये लॉकडाऊन असतानाही पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत संबंधित सैनिक व कॉलनीतील काही तरुणही सहभागी होते. या दारू-मटणाच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात संबंधित सैनिकाला वसाहतीत मारहाण करण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर घटनेतील तरुणांनी पुन्हा संबंधित सैनिकाच्या घरात घुसून शिवीगाळ करत दगड, प्लास्टिक पाईपने मारहाण करून डोक्याला, हातावर, पायावर, पाठीवर गंभीर दुखापत केली होती. घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. यामध्ये आणखी काही तरुणांचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ते तरुण सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहेत.
दरम्यान, या मारहाणीच्या वेळी गोळीबार झाल्याची अफवा शहरात पसरताच पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पो.कॉ. भगवान सानप, देविदास तांदळे, प्रल्हाद नागलोत, किरण बडे, नारायण कुटे, अरुण शेकडे, पो. कॉ. कुसळकर यांनी घटनास्थळी धाव घेत वसाहतीत पाहणी केली. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनीही या ठिकाणाची पाहणी केली.त्यानंतर आज पहाटे एक वाजता पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह व अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.